Fetching Data .

Loading verse structure and chapter context.

GyanDweepBeta
HomeLearnLibrary
eGurukulsDiscoverTemplesPanchanga
Sign Up
Sign Up

sahasranAma

śrīmanāce śloka

श्रीमनाचे श्लोक

Verse

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Verse

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ॥

Verse

नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

Verse

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥

Verse

जनी निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥२॥

Verse

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधीं वदावा ॥

Verse

सदाचार हा थोर सोडूं नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

Verse

मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पाप बुद्धी नको रे ॥

Verse

मना धर्मता नीति सोडूं नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥४॥

Verse

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥

Verse

मना कल्पना ते नको वीषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥

Verse

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥

Verse

नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥

Verse

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोशीत जावें ॥

Verse

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

Verse

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥

Verse

मना चंदनाचेपरी त्वां झिजावें । परी अंतरी सज्जना नीववावें ॥८॥

Verse

नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अति स्वार्थबुद्धि न रे पाप सांचे ॥

Verse

घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासरिखें दु:ख मोठें ॥९॥

Verse

सदा सर्वदा प्रीति रामॆं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ॥

Verse

देहेदु:ख तें सुख मानीत जावें । विवेकें सदा सस्वरूपीं भरावें ॥१०॥

Verse

जनीं सर्व सूखी असा कोण आहे । विचारें मना तुंचि शोधूनि पाहें ॥

Verse

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥११॥

Verse

मना मानसीं दु:ख आणूं नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेकें देहेबुद्धि सोडून द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

Verse

मना सांग पां रावणा काय जालें । अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें ॥

Verse

म्हणोनि कुडी वासना सांडि वेगीं । बळें लागला काळ हा पाठिलागीं ॥१३॥

Verse

जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला । परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥

Verse

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीएक ते जन्मलें आणि मेलॆ ॥१४॥

Verse

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥

Verse

चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥१५॥

Verse

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे ॥

Verse

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥१६॥

Verse

मनीं मानव व्यर्थ चिंता वहातें । अकस्मात होणार होऊनि जातें ॥

Verse

घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

Verse

मना राघवेंवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥

Verse

जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्र्लाघ्यवाणें ॥१८॥

Verse

मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे । मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें सोडूनि द्यावें ॥१९॥

Verse

बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तेचि मोठी ॥

Verse

निरोधें पचे कोंडिलें गर्भवासि । अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी ॥२०॥

Verse

मना वासना चूकवीं येरझारा । मना कामना सांडि रे द्रव्यदारा ॥

Verse

मना यातना थोर हे गर्भवासी ॥मना सज्जना भेटवीं राघवासी ॥२१॥

Verse

मना सज्जना हीत माझें करावें । रघूनायका दृढ चित्ती धरावें ॥

Verse

महाराज तो स्वामी वायूसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥

Verse

न बोलें मना राघवेंवीण कांही । जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं ॥

Verse

घडीनें घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडूं पहातो ॥२३॥

Verse

रघूनायकावीण वायां शिणावें । जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें ॥

Verse

सदासर्वदा नाम वाचे वसों दे । अहंता मनीं पापिणी ते नसों दे ॥२४॥

Verse

मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैंचा ॥

Verse

सुखाची घडी लोटतां सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥२५॥

Verse

देहेरक्षणाकारणें यत्न केला । परी शेवटीं काळ घेऊनि गेला ॥

Verse

करीं रे मना भक्ति या राघवाची । पुढें अंतरी सोडिं चिंता भवाची ॥२६॥

Verse

भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरीं रे मना धीर धाकासि सांडीं ॥

Verse

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥

Verse

दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥

Verse

मना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥

Verse

पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ॥

Verse

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२९॥

Verse

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

Verse

जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥

Verse

महासंकटी सोडिले देव जेणें । प्रतापें बळें आगळा सर्वगूणें ॥

Verse

जयातें स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥

Verse

अहल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥

Verse

जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥

Verse

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणें मेघमाळा ॥

Verse

चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥

Verse

उपेक्षा कदा रामरूपी असेना । जिवां मानवां निश्चयो तो वसेना ॥

Verse

शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३४॥

Verse

असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥

Verse

अनन्यासि रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥

Verse

सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ॥

Verse

सुखानंद - आनंद - कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥

Verse

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटीं स्वामी तैसा ॥

Verse

हरिभक्तिचा घाव गाजे निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥

Verse

मना प्रार्थना तुजला एक आहे । रघूनाथ थक्कीत होऊन पाहे ॥

Verse

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३८॥

Verse

जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । जयाचेनि योगें समाधान बाणे ॥

Verse

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥३९॥

Verse

मना पाविजे सर्वही सूख जेथें । अती आदरें ठेविंजे लक्ष तेथें ॥

Verse

विवेकें कुडी कल्पना पालटींजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४०॥

Verse

बहू हिंडता सौख्य होणार नाहीं । शिणावें परी नातुडे हीत कांहीं ॥

Verse

विचारें बरें अंतरा बोधवींजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४१॥

Verse

बहूतांपरी हेंचि आतां धरावें । रघूनायका आपुलेसे करावें ॥

Verse

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४२॥

Verse

मना सज्जना एक जीवीं धरावें । जनीं आपुलें हीत तूवां करावें ॥

Verse

रघूनायकावीण बोलों नको हो । सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥

Verse

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरें राघवाची करावी ॥

Verse

नसे राम तें धाम सोडूनि द्यावें । सुखालागिं आरण्य सेवीत जावें ॥४४॥

Verse

जयाचेनी संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥

Verse

तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीनें मती राम सोडी ॥४५॥

Verse

मना जे घडी राघवेंवीण गेली । जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥

Verse

रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनी पाहे ॥४६॥

Verse

मनीं लोचनीं श्रीहरी तोची पाहे । जनीं जाणता भक्त होऊनि राहे ॥

Verse

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥

Verse

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा । सदा रामनामें वदे नित्य वाचा ॥

Verse

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥

Verse

सदा बोलण्यासारिखें चालताहे । अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥

Verse

सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥

Verse

नसे अंतरी कामकारी विकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥

Verse

निवाला मनीं लेश नाहीं तमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥

Verse

मदे मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धि । प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥

Verse

सदा बोलणें न्रम वाचा सुवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥

Verse

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें । न लिंपे कदा दंभ वादें विवादें ॥

Verse

करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥

Verse

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥

Verse

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥

Verse

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ॥

Verse

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥

Verse

नसे मानसीं नष्ट वाशा दुराशा । वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ॥

Verse

ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥

Verse

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥

Verse

तया अंतरी क्रोध संताप कैंचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥

Verse

जगीं होइजे धन्य या रामनामें । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥

Verse

उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

Verse

नको वासना वीषयीं वृत्तिरूपें । पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥

Verse

सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोही नसावा ॥५८॥

Verse

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥

Verse

मनीं कामना राम नाहीं जयाला । अती आदरें प्रीति नाहीं तयाला ॥५९॥

Verse

मना राम कल्पतरू कामधेनू । निधी सार चिंतामणी काय वानूं ॥

Verse

जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आतां ॥६०॥

Verse

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे । तया अंतरीं सर्वदा तेंचि राहे । जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागुता शोक जीवीं धरावा ॥६१॥

Verse

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला । बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥

Verse

सुखानंद आनंद भेदें बुडाला । मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला ॥६२॥

Verse

घरीं कामधेनू पुढें ताक मागे । हरीबोध सांडूनि विवाद लागे ॥

Verse

करीं सार चिंतामणी काचखंडें । तया मागतां देत आहे उदंडें ॥६३॥

Verse

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना । अती काम त्या राम चित्तीं वसेना ॥

Verse

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥

Verse

नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें । अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें ॥

Verse

धरीं रे मना आदरें प्रीति रामीं । नको वासना हेमधामीं विरामीं ॥६५॥

Verse

नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहें ॥

Verse

जनीं वीष खातां पुढें सूख कैचें । करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥

Verse

घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥

Verse

करी संकटीं सेवकाचा कुडावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६७॥

Verse

बळें आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥

Verse

पुढें मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६८॥

Verse

सुखानंदकारी निवारीं भयातें । जनीं भक्तिभावें भजावें तयातें ॥

Verse

विवेकें त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥६९॥

Verse

सदा रामनामें वदा पूर्णकामें । कदा बाधिजेनापदा नित्य नेमें ॥

Verse

मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७०॥

Verse

जयाचेनि नामें महादोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती ॥

Verse

जयाचेनि नामें घंडे पुण्यठेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७१॥

Verse

न वेंचे कदा ग्रंथीचें अर्थ कांही । मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥

Verse

महाघोर संसार - शत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७२॥

Verse

देहेदंडणेचे महादु:ख आहे । महादु:ख तें नाम घेतां न राहे ॥

Verse

सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥

Verse

बहूतांपरी संकटे साधनांची । व्रतें दान उद्यापनें तीं धनाचीं ॥

Verse

दिनाचा दायाळु मनीं आठवावा । प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥

Verse

समस्तामध्ये सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूनि पाहें । जिवा संशयो वाउगा तो त्यजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥

Verse

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥

Verse

म्हणे दास विश्वास नामीं धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७६॥

Verse

करी काम निष्काम या राघवाचें । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥

Verse

करी छंद निर्द्वद्व हे गूण गातां । हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां ॥७७॥

Verse

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं । तया पामरा बाधिजे सर्व कांहीं ॥

Verse

महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥

Verse

मना पावना भावना राघवाची । धरीं अंतरीं सोडि चिंता भवाची ॥

Verse

भवाची जिवा मानवा भूली ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥७९॥

Verse

धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें । तरा दुस्तरा त्या परा सागरातें ॥

Verse

सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें । करा निकरा त्या खरा मत्सरातें ॥८०॥

Verse

मना मत्सरें नाम सांडूं नको हो । अती आदरें हा निजध्यास राहो ॥

Verse

समस्तांमधे नाम हें सार आहे । दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥८१॥

Verse

बहू नाम या रामनामीं तुळेना । अभाग्या नरा पामरा हें कळेना ॥

Verse

विषा औषध घेतलें पार्वतीशें । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥८२॥

Verse

जेणे जाळिला काम तो राम घ्यातो । उमेसी अती आदरें गूण गातो ॥

Verse

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें । परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥

Verse

विठोनें शिरी वाहिला देवराणा । तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥

Verse

निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥८४॥

Verse

भजा राम विश्राम यो़गेश्वरांचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥

Verse

स्वयें नीववीं तापसी चंद्रमौळी । तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ॥८५॥

Verse

मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे । सदानंद आनंद सेवूनि राहे ॥

Verse

तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हें नाम शोकापहारी ॥८६॥

Verse

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना । गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ॥

Verse

हरीभक्त तो शक्त कामास मारी । जगीं धन्य तो मारूती ब्रह्मचारी ॥८७॥

Verse

बहू चांगलें नाम या राघवाचें । अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचे ॥

Verse

करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । जिवां मानवा हेचिं कैवल्य साचें ॥८८॥

Verse

जनीं भोजनीं नाम वाचे वदावें । अती आदरें गद्यघोषें म्हणावें ॥

Verse

हरीचिंतनें अन्न सेवीत जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥८९॥

Verse

न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥

Verse

हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणी । बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥९०॥

Verse

नको वीट मानू रघूनायकाचा । अती आदरें बोलिजे राम वाचा ॥

Verse

न वेंचे मुखीं सापडे रे फुकाचा । करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥

Verse

अती आदरें सर्वही नामघोषें । गिरीकंदरीं जाइजे दूरि दोषें ॥

Verse

हरी तिष्ठतू तोषला नामतोषें । विशेषें हरा मानसीं रामपीसें ॥९२॥

Verse

जगीं पाहतां देव हा अन्नदाता । तया लागली तत्त्वता सार चिंता ॥

Verse

तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें । मना सांग पां रे तुझें काय वेंचे ॥९३॥

Verse

तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां । निवाला हरू तो मुखें नाम घेतां ॥

Verse

जपे आदरें पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेंचि हें नाम आतां ॥९४॥

Verse

अजामेळ पापी वदे पुत्रकामें । तया मुक्ति नारायणाचेनि नामें ॥

Verse

शुकाकारणें कुंटणी राम वाणी । मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥९५॥

Verse

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं । जपे रामनामावळी नित्य काळीं ॥

Verse

पिता पापरूपी तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ॥९६॥

Verse

मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची । अहंतागुणें यातना ते फुकाची ॥

Verse

पुढें अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥

Verse

हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानवदेहधारी ॥

Verse

तया रामनामीं सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥

Verse

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजि जातां गती पूर्वजांसी ॥

Verse

मुखें रामनामावळी नित्यकाळीं । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥

Verse

यथासांग रे कर्म तेम्ही घडेना । घडे धर्म तों पुण्य गांठीं पडेना ॥

Verse

दया पाहतां सर्व भूतीं असेना । फुकाचें मुखीं नाम तेंही वसेना ॥१००॥

Verse

जया नावडे नाम त्या येम जाची । विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची ॥

Verse

म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें । मुखें बोलतां दोष जाती स्वभावें ॥१०१॥

Verse

अती लीनता सर्वभावें स्वभावें । जना सज्जनालागि संतोषवावें ॥

Verse

देहे कारणी सर्व लावीत जावें । सगूणी अती आदरेंसी भजावें ॥१०२॥

Verse

हरिकिर्तनें प्रीति रामीं धरावी । देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी ॥

Verse

परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवीं करावी ॥१०३॥

Verse

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें । परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥

Verse

मना कल्पना धीट सैराट धांवे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥

Verse

विवेकें क्रिया आपुली पालटावी । अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ॥

Verse

जनीं बोलण्यासारिखें चाल बापा । मना कल्पना सोडिं संसारतापा ॥१०५॥

Verse

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा ॥

Verse

दया सर्वभूतीं जया मानवाला । सगा प्रेमळू भक्तिभावें निवाला ॥१०६॥

Verse

मना कोपआरोपना ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी ॥

Verse

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं । मना होइं रे मोक्षभागीं विभागी ॥१०७॥

Verse

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें । क्रीया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥

Verse

क्रियेवीण वाचाळता ते निवारीं । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥

Verse

जनीं वादवेवाद सोडुनि द्यावा । जनीं सूखसंवाद सूखें करावा ॥

Verse

जगीं तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥

Verse

तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें । विवेकें अहंभाव यातें जिणावें ॥

Verse

अहंतागुणें वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥

Verse

हिताकारणें बोलणें सत्य आहे । हिताकारणें सर्व शोधूनि पाहें ॥

Verse

हिताकारणें बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१११॥

Verse

जनीं सांगतां ऎकतां जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥

Verse

उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११२॥

Verse

जनीं हीत पंडीत सांडित गेले । अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ॥

Verse

तयाहूनि व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहें ॥११३॥

Verse

फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे । दिसेंदिस अभ्यंतरीं गर्व सांचे ॥

Verse

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारें तुझा तूंचि शोधूनि पाहें ॥११४॥

Verse

तुटे वाद संवाद तेथें करावा । विवेकें अहंभाव हा पालटावा ॥

Verse

जनीं बोलण्यासारिखें आचरावें । क्रियापालटें भक्तिपंथेचि जावें ॥११५॥

Verse

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी । तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥

Verse

दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी ॥नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥

Verse

धुरू लेंकरू बापुडें दैन्यवाणें । कृपा भाक्र्ता दीधली भेटि जेणें ॥

Verse

चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११७॥

Verse

गजेंद्रू महासंकटी वास पाहे । तयाकारणे श्रीहरी धांवताहे ॥

Verse

उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११८॥

Verse

अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणें तो जनी मुक्त केला ॥

Verse

अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११९॥

Verse

विधीकारणें जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागी ॥

Verse

जना रक्षणाकारणें नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२०॥

Verse

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥

Verse

न ये ज्वाळ विशाळ संनीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥

Verse

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तयाकारणें वामनू चक्रपाणी ॥

Verse

द्विजांकारणे भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२२॥

Verse

अहल्येसतीलागिं आरण्यपंथे । कुडावा पुढें देव बंदी तयांतें ॥

Verse

बळें सोडिता घाव घाली निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१२३॥

Verse

तये द्रौपदीकारणें लागवेगें । त्वरें धांवतो सर्व सांडूनि मागें ॥

Verse

कळीलागि जाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥

Verse

अनाथा दिनांकारणें जन्मताहे । कलंदी पुढे देव होणार आहे ॥

Verse

जया वर्णितां शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥

Verse

जनाकारणें देव लीलावतारी । बहूतांपरी आदरें वेषधारी ॥

Verse

तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी । १२६॥

Verse

जगीं धन्य तो रामसुखें निवाला । कथा ऎकतां सर्व तल्लीन झाला ॥

Verse

देहेभावना रामबोधें उडाली । मनोवासना रामरूपीं बुडाली ॥१२७॥

Verse

मना वासना वासुदेवीं वसों दे । मना कामना कामसंगीं नसो दे ॥

Verse

मना कल्पना वाऊगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥१२८॥

Verse

गतीकारणें संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥

Verse

रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होऊनि राहें ॥१२९॥

Verse

मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा ॥

Verse

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥१३०॥

Verse

भजाया जनीं पाहता राम एकू । करीं बाण एकू मुकीं शब्द एकू ॥

Verse

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू । धर जानकीनायकाचा विवेकू ॥१३१॥

Verse

विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥

Verse

बरें शोधिल्यावीण बोलों नको हो । जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥

Verse

हरिभक्त वीरक्त विज्ञानराशी । जेणें मानसी स्थापिलें निश्चयासी ॥

Verse

तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे । तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥१३३॥

Verse

नसे गर्व आंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भो़गी दयादक्ष योगी ॥

Verse

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इहीं लक्षणीं जाणिजे योगीराणा ॥१३४॥

Verse

धरी रे मना संगती सज्जनाची । जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची । बळें भाव सद्‌बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥

Verse

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत तें संत आनंत पाहें ॥

Verse

जया पाहतां द्वैत कांही दिसेना । भय मानसीं सर्वथाही असेना ॥१३६॥

Verse

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥

Verse

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना । जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥१३७॥

Verse

भ्रमें नाडळे वित्त ते गुप्त जालें । जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ॥

Verse

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥१३८॥

Verse

पुढे पाहतां सर्वही कोंदलेंसे । अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥

Verse

अभावें कदा पुण्य गांठीं पडेना । जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥१३९॥

Verse

जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं । गुणें गोविलें जाहलें दु:ख देहीं ॥

Verse

गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥१४०॥

Verse

म्हणे दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥

Verse

गुरू-अंजनेंवीण तें आकळेना । जुने ठेवणें मीपणें ते कळेना ॥१४१॥

Verse

कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥

Verse

गळेना गळेना अहंता गळेना । बळे आकळेना मिळेना मिळेना ॥१४२॥

Verse

अविद्यागुणें मानवा ऊमजेना । भ्रमें चुकलें हीत तें आकळेना ॥

Verse

परीक्षेविणें बांधिलें दृढ नाणें । परी सत्य मिथ्या असें कोण जाणे ॥१४३॥

Verse

जगीं पाहतां साच तें काय आहे । अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥

Verse

पुढें पाहतां पाहतां देव जोडे । भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥१४४॥

Verse

सदा वीषयो चिंतितां जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥

Verse

विवेकें सदा सस्वरूपीं भरावें । जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें ॥१४५॥

Verse

दिसे लोचनी तें नसे कल्पकोडी । अकस्मात आकारलें काळ मोडी ॥

Verse

पुढें सर्व जाईल कांही न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४६॥

Verse

फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचले मीपणें तें कळेना ॥

Verse

तया एकरूपासि दूजें न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४७॥

Verse

निराकार आधार ब्रह्मादिकांचा । जया सांगतां शीणली वेदवाचा ॥

Verse

विवेकें तदाकार होऊनि राहें । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४८॥

Verse

जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे । जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे ॥

Verse

जगीं पाहतां पाहणें जात आहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१४९॥

Verse

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं । नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ॥

Verse

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ॥१५०॥

Verse

खरें शोधितां शोधितां शोधिताहे । मना बोधितां बोधितां बोधताहे ॥

Verse

परी सर्वही सज्जनाचेनि योगें । बरा निश्चयो पाविजे सानुरागें ॥१५१॥

Verse

बहूतां परी कूसरी तत्त्वझाडा । परी पाहिजे अंतरी तो निवाडा ॥

Verse

मना सार साचार तें वेगळें रे । समस्तांमधें एक तें आगळें रे ॥१५२॥

Verse

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें । समाधान कांहीं नव्हे तानमानें ॥

Verse

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें । समाधान तें सज्जनाचेनि योगें ॥१५३॥

Verse

महावाक्य तत्त्वादिकें पंचिकर्णे । खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥

Verse

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥१५४॥

Verse

दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें । बरें पाहतां गूज तेथेंचि आहे । करीं घेउं जातां कदा आडळेना । जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना ॥१५५॥

Verse

म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहें । अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥

Verse

जनीं मीपणें पाहतां पाहवेना । तया लक्षितां वेगळें राहवेना ॥१५६॥

Verse

बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे । जया निश्च्च्यो येक तोही न साहे ॥

Verse

मती भांडती शास्त्रबोधें विरोधें । गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥१५७॥

Verse

श्रुती न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें । स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें ॥

Verse

स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे । मना सर्व जाणीव सांडून राहें ॥१५८॥

Verse

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रुची प्राप्त कैंची ॥

Verse

अहंभाव ज्या मानसींचा विरेना । तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना ॥१५९॥

Verse

नको रे मना वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी ॥

Verse

नको रे मना शिकऊं पूढिलासी । अहंभाव जों राहिला तुजपासीं ॥१६०॥

Verse

अहंतागुणें सर्वही दु:ख होतें । मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ॥

Verse

सुखी राहतां सर्वही सुख आहे । अहंता तुझी तूचि शोधूनि पाहें ॥१६१॥

Verse

अहंतागुणें नीति सांडी विवेकी । अनीतीबळें श्र्लाघ्यता सर्व लोकीं ॥

Verse

परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥१६२॥

Verse

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला । देहातीत तें हीत सांडीत गेला ॥

Verse

देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६३॥

Verse

मनें कल्पिला वीषयो सोडवावा । मनें देव निर्गुण तो वोळखावा ॥

Verse

मनें कल्पितां कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥

Verse

देहादीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चीत ठेला ॥

Verse

हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥

Verse

अहंकार विस्तारला या देहाचा । स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा । बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥

Verse

बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥

Verse

घडीनें घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६७॥

Verse

करी वृत्ति जो संत तो संत जाणा । दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा ॥

Verse

उपाधी देहेबुद्धितें वाढवीते । परी सज्जना केविं बाधूं शके ते ॥१६८॥

Verse

नसे अंत आनंत संता पुसावा । अहंकार विस्तार हा नीरसावा ॥

Verse

गुणेंवीण निर्गुण तो आठवावा । देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥१६९॥

Verse

देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी । विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी ॥

Verse

तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें । म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें ॥१७०॥

Verse

असे सार साचार तें चोरलेंसे । इंही लोचनीं पाहतां दृश्य भासे ॥

Verse

निराभास निर्गुण तें आकळेना । अहंतागुणें कल्पितांही कळेना ॥१७१॥

Verse

स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥

Verse

मुळीं कल्पना दो रूपें तेचि जाली । विवेकें तरी सस्वरूपीं मिळाली ॥१७२॥

Verse

स्वरूपीं उदेला अहंकारराहो । तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहो ॥

Verse

दिशा पाहतां ते निशा वाढताहे । विवेकें विचारें विवंचूनि पाहें ॥१७३॥

Verse

जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना । भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना ॥

Verse

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो । दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो ॥१७४॥

Verse

विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी । परी लीहिता कोण त्याचे कपाळीं ॥

Verse

हरू जाळितो लोक संहारकाळीं । परी शेवटीं शंकरा कोण जाळी ॥१७५॥

Verse

जनीं द्वादशादित्य हे रुद्र अक्रा । असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥

Verse

जगीं देव धुंडाळितां आढळेना । जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना ॥१७६॥

Verse

तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥

Verse

कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगीं मीपणासी ॥१७७॥

Verse

जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधूनि कोणी न पाहे ॥

Verse

जगीं पाहतां देव कोट्यानुकोटी । जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥१७८॥

Verse

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले । तया देवरायासि कोणी न बोले ॥

Verse

जगीं थोरला देव तो चोरलासे । गुरूविण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥

Verse

गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ॥

Verse

मनीं कामना चेटकें धातमाता । जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥१८०॥

Verse

नव्हे चेटकी चाळकू द्र्व्यभोंदू । नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥

Verse

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू । जगीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥१८१॥

Verse

नव्हे वाउगी चाहूटी काम पोटीं । क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥

Verse

मुखीं बोलिल्यासारखें चालताहे । मना सद्‍गुरू तोचि शोधुनि पाहें ॥१८२॥

Verse

जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरा़गी । कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥

Verse

प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगें समाधान बाणे ॥१८३॥

Verse

नव्हे तेंचि जालें नसे तेंचि आलें । कळोण लागलें सज्जनाचेनि बोलें ॥

Verse

अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें । मना संत आनंत शोधीत जावें ॥१८४॥

Verse

लपावें अती आदरें रामरूपीं । भयातीत निश्चीत ये सस्वरूपीं ॥

Verse

कदा तो जनीं पाहतांही दिसेना । सदा ऎक्य तो भिन्नभावें वसेना ॥१८५॥

Verse

सदा सर्वदा राम सन्नीध आहे । मना सज्जना सत्य शोधून पाहें ॥

Verse

अखंडीत भेटी रघूराजयोगू । मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥१८६॥

Verse

भुतें पिंड ब्रह्मांड हें ऎक्य आहे । परी सर्वही सस्वरूपीं न साहे ॥

Verse

मना भासलें सर्व कांहीं पहावें । परी संग सोंडूनि सूखी रहावे ॥१८७॥

Verse

देहेभान हें ज्ञानशस्त्रें खुडावें । विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें ॥

Verse

विरक्तीबळें निंद्य सर्वै त्यजावें । परी संग सोंडूनि सूखे रहावें ॥१८८॥

Verse

मही निर्मिली देव तो ऒळखावा । जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ॥

Verse

तया निर्गुणालागि गूणी पहावें । परि संग सोडूनि सूखें रहावें ॥१८९॥

Verse

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥

Verse

तया निर्विकल्पासि कल्पीत जावें । परी संग सोडूनि सूखें रहावें ॥१९०॥

Verse

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना । तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना ॥

Verse

परब्रह्म तें मीपणें आकळेना । मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥१९१॥

Verse

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें । दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें ॥

Verse

तया खुण ते हीन दृष्टांत पाहें । तेथें संग नि:संग दोनी न साहे ॥१९२॥

Verse

नव्हे जाणता नेणता देवराणा । न ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां ॥

Verse

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥

Verse

वसे ह्रदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरें साधकू प्रश्न ऎसा ॥

Verse

देहे टाकितां देव कोठें रहातो । परी मागुता ठाव कोठें पहातो ॥१९४॥

Verse

वसे ह्र्दयीं देव तो जाण ऎसा । नभाचेपरी व्यापकू जाण तैसा । सदा संचला येत ना जात कांही । तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥१९५॥

Verse

नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं । रिता ठाव या राघवेंवीण नाही ॥

Verse

तया पाहतां पाहतां तेचिं जालें । तेथें लक्षा आलक्षा सर्वे बुडालें ॥१९६॥

Verse

नभासारिखें रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ तुटे भवाचें ॥

Verse

तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥१९७॥

Verse

नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे ॥रघूनायका ऊपमा ते न साहे ॥

Verse

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें । तया व्यापदू व्यर्थ कैसे म्हणावें ॥१९८॥

Verse

अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे । तेथें तर्कसंपर्क तोही न साहे ॥

Verse

अती गूढ तें दृश्य तत्काळ सोपें । दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें ॥१९९॥

Verse

कळे आकळे रूप तें ज्ञान होतां । तेथें आटली सर्वसाक्षी-अवस्था ॥

Verse

मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे । तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहें ॥२००॥

Verse

कदा ऒळखीमाजि दूजें दिसेना । मनीं मानसीं द्वैत कांही वसेना ॥

Verse

बहुतां दिसां आपुली भेटी जाली । विदेहीपणें सर्व काया निवाली ॥२०१॥

Verse

मना गूज रे तूज हें प्राप्त जालें । परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥

Verse

सदा श्रवणें पाविजे निश्चयासी । धरीं सज्जनी संगती धन्य होसी ॥२०२॥

Verse

मना सर्वही संग सोंडूनि द्यावा । अती आदरें सज्जनाचा धरावा ॥

Verse

जयाचेनि संगें महादु:ख भंगे । जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥

Verse

मना संग हा सर्व संगांस तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ॥

Verse

मना संग हा साधकां शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत नि:शेष मोडी ॥२०४॥

Verse

मनाचीं शतें ऎकतां दोष जाती । मतीमंद ते साधनायोग्य होती ॥

Verse

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगीं । म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति भोगी ॥२०५॥

Verse

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Verse

करुणाष्टके करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे. अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

Verse

अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥१॥

Verse

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥

Verse

रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥२॥

Verse

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥

Verse

रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥३॥

Verse

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥

Verse

प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥४॥

Verse

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥

Verse

घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥५॥

Verse

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥

Verse

तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥६॥

Verse

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥

Verse

झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥७॥

Verse

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥

Verse

दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥८॥

Verse

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे । पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥

Verse

जळधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥

Verse

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया । विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥

Verse

सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥१०॥

Verse

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥

Verse

जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥

Verse

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे । जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥

Verse

विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥१२॥

Verse

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें । भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥

Verse

भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना । परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥१३॥

Verse

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं । सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥

Verse

घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥१४॥

Verse

जळचर जळवासी नेणती त्या जळासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥

Verse

भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥१५॥

Verse

असंख्यात ते भक्त होऊनि गेले । तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥

Verse

नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥१६॥

karuṇāṣṭake
śrī gaṇapativedapādastavaḥ

सा विद्या या विमुक्तये

Built with Sankalpa at Gyaandweep

Gyaandweep

© 2022-2026 Granthajyoti Pvt Ltd.

Privacy & Terms